भाजीपाला उत्पादक अडचणीत

निर्यातक्षम भाजीपाला जनावरांना खाऊ घालण्याची वेळ

पुणे – लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद असून वाहतुकीच्या साधनांचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील भाजीपाल्याची पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नाही. परिणामी पॉलिहाऊसमध्ये उत्पादित होणाऱ्या निर्यातक्षम भाजीपाला जनावरांना खाऊ घालण्याची वेळ पॉलिहाऊस चालकांवर आली आहे. त्यामुळे हे उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

पुणे जिल्ह्यात 300 पॉलिहाऊस उत्पादक असून त्यांच्या माध्यमातून पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह मुंबई व गोवा येथे दररोज विलायती भाजीपाला पाठविला जातो. यामध्ये आईसबर्ग, ब्रोकोली, रेड यलो कॅप्सिकम, रोमन, लोलोरसा, पॅकचॉय, बेसिल, लिक, राम, रोजमेरी, जुकेनी, रेडकॅबेज, चायना कॅबेज, ऑस्पागस या विलायती भाजीपाल्याचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वांत प्रथम सार्वजनिक वाहतुकीवर बंधने आली. त्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळी बंद झाल्या. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्स व नामांकित रेस्टॉरंटदेखील बंद झाले. मात्र, पुरवठा थांबल्याने या भाजीपाल्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या केवळ गोव्यात या भाजीपाल्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज निघणारे उत्पादन पॉलिहाऊसमध्ये पडून रहात आहे. लॉकडाऊन काळात जिल्हाभरातील पॉलिहाऊस चालकांना सुमारे सहा कोटींचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन शेतकरी कंपन्यांची स्थापना करून पॉलिहाऊस उभारली आहेत. लॉकडाऊनमुळे पॉलिहाऊस चालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून या व्यवसायाची उलाढाल ठप्प झाली आहे.

– संपत थोरवे, आयकेएस प्रोड्युसर शेतकरी कंपनी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.