रहिमतपूर – उरमोडी कालव्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्नात आर्वी, ता. कोरेगाव येथील प्रशांत लक्ष्मण दळवी (वय 20) याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी कालव्यात झाडाच्या बुंध्याला अडकलेल्या स्थितीत सापडला. याबाबत माहिती अशी, प्रशांत दळवी हा शुक्रवारी (दि. 28) गुरे चारायला आर्वी येथील बाळोबाच्या खिंडीकडे गेला होता. तेथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याच्या म्हशीचे रेडकू उरमोडी कालव्याच्या पाण्यात पडले.
रेडकू वाहून जात असताना, तो कालव्याच्या कडेने पळत होता. उतारावर पाण्याचा प्रचंड वेग असल्याने कालव्यामध्ये उतरू नकोस, असे बघणाऱ्यांनी त्याला सांगितले होते.रेडकू पाण्यात पडल्याची माहिती प्रशांतचे वडील लक्ष्मण यांना समजली. त्यामुळे लक्ष्मण दळवी आणि काही ग्रामस्थ रेडकू शोधायला कालव्याकडे गेले होते. त्यांना रेडकू व प्रशांत दिसले नाहीत.काही अंतरावर कालव्याच्या कडेला प्रशांतची चप्पल, टॉवेल, छत्री, डबा आणि पिशवी सापडली. ग्रामस्थ शोध घेत असताना, कोंबडवाडी हद्दीत तलावानजीक जखमी झालेले रेडकू सापडले.
मात्र, प्रशांतचा ठावठिकाणा लागला नाही. प्रशांत सापडत नसल्याने, ग्रामस्थांनी उरमोडी कालवा व्यवस्थापनाला पाणी बंद करण्याची विनंती केली. कालव्याचे पाणी बंद झाल्यावर रविवारी सकाळी प्रशांत दळवीचा मृतदेह कालव्याच्या पात्रातील झाडाच्या बुंध्याला अडकून पडलेला दिसला. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी घटनास्थळी भेट दिली.