नवी दिल्ली : तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरुण तेजपाल यांची गोवा सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता.
तरुण तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३ मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप त्यांच्यावर होता. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली.
Goa: Former Editor-in-Chief of Tehelka Magazine, Tarun Tejpal acquitted of all charges in the alleged sexual assault case against him.
(File photo) pic.twitter.com/peaMdXUfHV
— ANI (@ANI) May 21, 2021
मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.
यापूर्वी या प्रकरणाचा निकाल २७ एप्रिलला लागणार असे जाहीर कऱण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या निकालाला १९ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी दोन ते तीन दिवसांपासून लाईट नसल्याने न्यायाधीशांना या प्रकरणाचा अभ्यास करता आला नाही आणि त्यामुळे त्यांना अधिक वेळ हवा असल्याने निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे तेजपाल यांचे वकील अॅडव्होकेट सुहास वेलिप यांनी सांगितले.