न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केले असे काही तुम्हीही कराल कौतुक 

नवी दिल्ली – खेळ, मैदान, टूर्नामेंट काहीही असो खेळाडूवृत्ती महत्वाची असायला पाहिजे, असे नेहमीच म्हंटले जाते. याचीच प्रचिती  १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये आली आहे. वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला चालण्यास त्रास होत असल्याने प्रतिस्पर्धी संघातील दोन खेळाडूंनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले. यावेळीचा व्हिडीओ क्रिकेट वर्ल्ड कप ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

वेस्ट इंडिजचा फलंदाज कर्क मॅकेन्झीला ४३ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धाव काढताना दुखापत झाली. तो ९९ धावांवर फलंदाजी करीत होता. पण वेस्ट इंडीजने नववी विकेट गमावल्यानंतर त्याने पुन्हा ४८ व्या षटकाच्या फलंदाजीसाठी तो पुन्हा मैदानात आला. मात्र, क्रिस्टियन क्लार्कनच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर मैदानाबाहेर पडताना कर्क मॅकेन्झीला क्रॅम्पमुळे चालण्यासाठी वेदना होत होत्या. हे पाहून न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.

दरम्यान, जाॅए फील्ड आणि क्रिस्टियन क्लार्क यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ८६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वेस्टइंडिजवर २ विकेटनी विजय मिळवित उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. क्रिस्टियन क्लार्क सामन्याचा मानकरी ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.