नागरी सहकारी बॅंकांबाबत गैरसमज नको

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशनचे आवाहन

पुणे – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 95 हजार 700 कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. त्यामानाने नागरी सहकारी बॅंकामधील घोटाळ्यांचे प्रमाण 0.21 टक्के आहे त्यामुळे नागरी सहकारी बॅंकांबाबत गैरसमज करुन घेऊ नयेत, असे आवाहन महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशनने केले आहे.

नागरी सहकारी बॅंकिंग क्षेत्रामध्ये देशपातळीवर गेल्या पाच वर्षांत एक हजार गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये सुमारे 230 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्याबाबत “मॅफकॅब’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. नागरी सहकारी बॅंकांमध्ये 2018-19 मध्ये देशभरात 189 प्रकरणांमध्ये 127 कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत, याउलट राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये याच वर्षात 3 हजार 766 प्रकरणांमध्ये 64 हजार 509 कोटी रुपयांचे घोटोळे झाल्याचे समोर आले आहे.

नागरी सहकारी बॅंकांमध्ये गेल्या पाच वर्षांत गैरव्यवहाराच्या एक हजार प्रकरणांमध्ये 230 कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. त्यापैकी कॉसमॉस बॅंकेतील 94 कोटी रुपयांच्या सायबर हल्ल्याचा समावेश आहे, त्याला घोटाळा म्हणता येत नाही. त्यामुळे ही रक्कम वजा करता या आर्थिक वर्षात केवळ 33.70 कोटी रुपयांचा म्हणजेच प्रत्येक प्रकरणात केवळ 18 लाख रुपयांची रक्कम गुंतल्याचे दिसते, असे अनास्कर यांनी सांगितले.

रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार देशातील संपूर्ण बॅंकिंग क्षेत्रात 2018-19 मध्ये झालेल्या घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या एकूण रकमेत राष्ट्रीयकृत बॅंकांचा हिस्सा 90, तर खासगी बॅंकाचा 7.69 टक्के आहे. परदेशी बॅंकांचा 1.33 इतर आर्थिक संस्थाचा 0.77 टक्के व सहकारी बॅंकाचा केवळ 0.21 टक्के इतका हिस्सा आहे, असे अनास्कर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.