– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जवर टीका करताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरही ताशेरे ओढले गेले. मात्र, तोल सांभाळून केलेली टीका चाहत्यांना तसेच विरोधकांनाही पटते. इथे युवराजसिंगचे वडील योगराज यांनी पातळी सोडून टीका केली. म्हणूनच सांगावेसे वाटते योगराजजी जरा जपून बोला. तुम्ही ज्याच्यावर टीका करत आहात तो तुमच्या दृष्टीने कसाही असेल. पण त्याच्यावर अश्लाघ्य शब्दांत केलेली टीका तुमचा स्तर दाखवते. इथे खरेतर लायकी हा शब्द शोभून दिसला असता. मात्र, हा शब्द आमचा स्तर खालावल्याचे दाखवेल.
धोनीने जे काही मिळवले ते सगळे संपून जाईल, असे म्हणताना योगराज म्हणतात की तो एका भाकरीच्या तुकड्यासाठीही मोहताज होईल. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ म्हणतात हे कदाचित योगराज यांनाही माहिती नसेल. युवराजसिंग हा धोनीच्या आधी भारतीय संघात आला, म्हणून त्याला कर्णधारपद द्यायला हवे. तसेच त्याला फेअरवेल सामना मिळायला हवा. खरेतर ही वैयक्तिक मते झाली. परंतु युवराजकडे खरेच नेतृत्वगुण होते का, ते योगराज सांगू शकले नाहीत.
पुत्रप्रेमासाठी आंधळे झालेले वडील आपण इतिहासातच नव्हे तर पुराणकाळापासून पाहात आलो आहोत. योगराजही त्यातलेच. ज्या धोनीने युवराजवर खरेतर कधीही अन्याय केला नाही. त्याला सातत्याने पाठिंबा दिला. तो कसोटीत अपयशी ठरूनही त्याला वगळले नव्हते, हा संदर्भ मात्र योगराज विसरलेले दिसतात. काय आहे “उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशीही एक म्हण आहे. ती देखील योगराज यांना माहिती नसावी.
धोनीने विश्वकरंडक मिळवून दिला नसेल, पण तो त्या संघाचा कर्णधार होता. त्याने आयपीएलची चार विजेतीपदे चेन्नईला मिळवून दिली नसतील पण तो त्या प्रत्येक विजयी संघाचा कर्णधार होता. श्रेय लाटले असे म्हणा हवे तर पण त्याला भाकरच तुकडाही मिळणार नाही हे वक्तव्य कशासाठी. युवराजवर अन्याय झाला असे सांगतात मग ते स्पष्ट करा. कसा, कुठे व काय अन्याय केला. केवळ राजकीय नेते एक पिल्लू सोडून देतात व चर्चेची गुऱ्हाळे 24 तास वाहिन्यावाले चालवतात. तसेच योगराज यांना अपेक्षित आहे.
युवराज व धोनी हे खरेतर खूप चांगले मित्र बनले होते. त्यांच्यात स्पर्धा होती, पण ईर्ष्या नव्हती. धोनी कसा आहे ते युवराजपेक्षा जास्त चांगले कोण सांगेल. पण योगराज यांना नक्की काय बोचते व बोचले हे त्यांनाच माहीत. पण धोनीवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत हेच खरे. मात्र, एक सांगावेसे वाटते, योगराजजी तुम्हीही एक क्रिकेटपटू होतात. मैदानावर, ड्रेसिंग रुममध्ये, संघ बैठकीत काय घडते हे माहिती असूनही केवळ धोनीबाबत आकस म्हणून वाट्टेल ते बोलून स्वतःची प्रतिष्ठा का घालवता.