मुंबई: जगभरात कोरोनाच्या लसीवर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. याचबरोबर, कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारने सुद्धा आपली तयारी व नियोजन मजबूत केले आहे. नुकतेच भारतात कोरोनाच्या तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. परंतु, योगगुरु बाबा रामदेव यांनी आता लसीकरणासंबंधी एक वैयक्तीक विधान केले आहे. मी कोरोनाची लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीवर बोलताना लसीविषयी बाबा रामदेव यांनी विधान केले आहे. “कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच कोरोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी कोरोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असे बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले.
आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले, “135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 2021 मध्ये सामान्य लोकांना लस मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि जीवनशैलीतील बदलांपासून लोकांचे प्राण वाचतील”, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेतील सर्व पक्षांच्या मुख्य नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वपक्षीय बैठक झाली होती.