जेजूरी : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने सोमवती अमावस्येनिमित्त पालखी सोहळा सुरू झाला. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. सोन्याच्या जेजूरीचे हे रूप अधिकच खुलले आहे.
अवघी जेजुरी नगरी खंडोबाच्या गजराने दुदुमली आहे. आज सकाळी ७ वाजता खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी निघाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना केली आहे. भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. खंडोबाच्या सोमवती यात्रेला आज सकाळी ७ पासून सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या देवीचे कर्हा नदीवर स्नान होणार आहे. हा मोठा सोहळा असतो.
यंदाच्या या सोहळ्यात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला. मागील वर्षी सोमवती यात्रेत खंडोबा गडावर पालखी उतरताना अपघात होऊन सहा जण जखमी झाले होते. त्यामुळं यंदा चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी विशेष काळजी म्हणून पालखीला खांदा देणाऱ्या खांदेकर्यांना वेगळा ड्रेस कोड देण्यात आल .
सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून ट्वीट करत माहिती देण्यात आलेली आहे. ट्वीटमध्ये म्हटले की, “जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त वाहतूक बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी 13 नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा.” यात बारामती आणि निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. संबंधित वाहनं मोरगाव-सुपा- केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गवरून पुणे मार्गे वळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.