विजयस्तंभ अभिवादन पार्श्वभूमीवर जागरूकता उपक्रम
यवत – भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर यवत (ता. दौंड) येथील पोलीस ठाण्यातील पोलिसांनी यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारील बाजार मैदानात दंगल उसळल्यानंतर दंगल नियंत्रणात आणण्यासाठी “दंगा काबू’ प्रात्यक्षिक मंगळवार (दि. 24 ) सादर करण्यात आले होते.
यावेळी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, नितीन लकडे यांसह पस्तीस ते चाळीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस हवालदार सुनील भिसे यांनी उपस्थित पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या दिवशी अचानक उसळलेल्या दंगलीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना दंगल नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तो त्वरीत नियंत्रणात आणण्यासाठी कोणते उपाय करावेत, यासाठी “दंगा काबू’ प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस हवालदार सुनील भिसे यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.