प्रत्येक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या युनिटला पाच लाखांचे टार्गेट
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने रायफल शूटींग स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेसाठी येणारा खर्च पिंपरी चिंचवड पोलीस करणार आहे. या स्पर्धेचा निधी जमविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेला पाच लाख रुपये जमविण्याचे टार्गेट दिले आहे. हा निधी मिळविण्यासाठी पोलीस धनिकांच्या दारी फिरताना दिसत आहे.
म्हाळुंगे जवळील बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात 13 ते 18 जानेवारी 2020 रोजी रायफल शूटींग स्पर्धा आयोजित केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. यामुळे या स्पर्धेचा खर्चही पोलिसांच्या माथी पडणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील लष्कर, निमलष्कर, विविध राज्याचे पोलीस सहभागी होणार आहेत. अंदाजे 500 स्पर्धक सहभागी होण्यासाठी येणार आहे. यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्थाही यजमानपद भूषविणारे पिंपरी चिंचवड पोलीस करणार आहे. या स्पर्धेच्या उद्घटनासाठी पोलीस महासंचालक येणार असून समारोपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या स्पर्धेच्या खर्चासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेला पाच लाख रुपये जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी वेगळे बॅंक खातेही उघडण्यात आले आहे. हा निधी जमविण्यासाठी पोलीस धनिकांच्या दारी चकरा मारताना आढळून येत आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपन्या आहेत अशा तळेगाव एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी चिखली आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांना निधी जमविणे सोपे आहे. मात्र ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कंपन्या नाहीत त्या ठिकाणी निधी जमविण्यासाठी पोलिसांना पायपीट करावी लागत आहे.
शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री लुटमारीचे प्रकार घडत आहेत. शहरातून दररोज वाहने चोरीस जात आहेत. तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकारही पुन्हा वाढीस लागले आहेत. आत्तापर्यंत 13 एटीएमबाबतचे गुन्हे घडले असून त्यापैकी बहुतांश गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. हाणामारी आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि पोलीस इव्हेंट कंपनीप्रमाणे स्पॉन्सर्स शोधत आहेत.