पुणे – मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना कोणत्याही व्यवसायाची उत्पादनाची बाजू मला समजली. मात्र व्यवसायातून पैसा कसा कमवावा, देशाची अर्थव्यवस्था कशी काम करते, या उत्सुकतेतून व्यवस्थापन क्षेत्राकडे वळण्याचा मी निर्णय घेतला, असे “कॅट’ परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या यश मंधाना या पुणेकर तरुणाने सांगितले. विशेष म्हणजे, अत्यंत कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले.
देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात “आयआयएम’ या संस्थामध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कॉमन ऍडमिशन टेस्टचा (कॅट) निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात 99.99 टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावणाऱ्या यश हा सध्या आयआयटी मुंबईत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. “आयआयएम अहमदाबाद येथून आपल्याला मुलाखतीसाठी निमंत्रण येईल’, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
यशची आई गृहिणी असून त्यांचे वडील थरमॅक्समध्ये केमिकल इंजिनिअर आहेत. यश म्हणाला, मी सध्या अनेक क्षेत्रातील संधींकडे पाहात आहे. मात्र बहुदा मी फायनानन्स क्षेत्रात स्थीरावेन. “कॅट’ परीक्षेत उमेदवाराची व्यक्तीगतरित्या केलेली तयारीच उपयुक्त ठरत असते. मॉक टेस्ट देणे महत्वाचे असते असे सांगून यश म्हणाला, त्यात कमी गुण मिळाले तर आपण आपल्या तयारीचा फेरआढावा घेऊ शकतो. त्यामुळे आपले गुण वाढवता येऊ शकतात. तुमच्या तयारीचा आढावा घेणारी कॅटची मॉक टेस्ट ज्या ज्या वेळी देता त्या त्या वेळी आपल्या चुकांचे विश्लेषण करा आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला ही यशने दिला.