रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका (भाग-१)
तिसरी चूक: लोकेशन न पाहणे
घर खरेदी करताना अनेक मंडळी लोकेशनची पडताळणी चांगल्या रितीने करत नाहीत. लोकशनवरच मालमत्तेची भविष्यातील किंमत अवलंबून असते.
काय करावे
जर आपण स्वत: राहण्यासाठी घर खरेदी करत असाल तर स्वत:, पत्नीचे ऑफीस, मुलांची शाळा या गोष्टी लक्षात घेऊन घराचे लोकेशन निश्चित करावे. त्याचबरोबर रस्ते, रेल्वेमार्ग जवळच असेल याचेही अवलोकन करायला हवे. वीजपुरवठा, पाणीपुरवठा त्याचीही चाचपणी करा. तसेच संबंधित भागातील कायदा आणि सुव्यव्थेची स्थिती जाणून घ्यावी. जवळपास शॉपिंग सेंटर, मॉल, पार्क किंवा रुग्णालयाची माहिती घ्यावी. घर खरेदी करण्यापूर्वी त्या भागातील उणिवा आणि चांगल्या बाजू जाणून घ्याव्यात. संबंधित ठिकाणी रोजगार निर्मितीला किती चालना मिळते, मालमत्तेच्या भावात कसा बदल होतो, हे देखील पाहवे. सार्वजनिक वाहतूक, मेट्रो स्थानक, बसस्थानक, रुग्णालय, शाळा, मॉल, पेट्रोल पंप आदींचे अवलोकन करून घरासाठी लोकेशन निवडावे.
चौथी चूक: बिल्डरची चाचपणी न करणे
अनेक खरेदीदार आपण ज्या ठिकाणी फ्लॅट खरेदी करत आहोत त्या निर्मात्याची, बिल्डरची किंवा डेव्हलपरची अधिक चौकशी करत नाहीत. त्यांच्या भूलथापांना आणि पोकळ आश्वासनांना काही खरेदीदार बळी पडतात आणि कालांतराने त्यांना पश्चाताप होतो.
काय करावे
निवासी प्रकल्पाच्या कामांना साधारणपणे उशिर होतोच. यासाठी विकासकांच्य मागील प्रकल्पाची कामगिरी आणि कालावधी जाणून घ्यावा. त्याची गुणवत्ता, पारदर्शक व्यवहाराची हमी या गोष्टीही जाणून घ्याव्यात. ज्या जमीनीवर नवीन प्रकल्प उभारला जात आहे, त्या जमीनीची मालकीही कोणाची आहे, हे पाहवे. महानगरपालिकेकडून बांधकामाच्या सर्व परवानग्या मिळाल्यात की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. बिल्डरची आर्थिक स्थिती देखील जाणून घ्यावी. जेणेकरून भविष्यात गृहप्रकल्प रेंगाळत पडणार नाही आणि आपण आर्थिक अडचणीत सापडणार नाहीत.
– सत्यजित दुर्वेकर