कोलकाता – बीसीसीआयशी करारबद्ध झालेल्या खेळाडूंनी थेट माध्यमांशी संवाद साधू नये किंवा अत्यंत गोपनीय झालेला संवाद असा चव्हाट्यावर आणू नये, असे संकेत आहेत. मात्र, वृद्धिमान साहाने हे संकेत पाळले नाहीत, अशा शब्दात भारताचे माजी कसोटीपटू, कर्णधार व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माझे संघातील स्थान भक्कम आहे, असा संदेश बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिला होता. मात्र, त्यांनी आपला शब्द फिरवला. तसेच राहुल द्रविड यांनी मला निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला होता, असा गौप्यस्फोट साहाने केला होता. साहाच्या वक्तव्याने आपण खूप निराश झालो आहे. प्रशिक्षक आणि खेळाडूमधील अत्यंत गोपनीय संवाद साहाने उघड केले. साहाला त्याच्या संघातील स्थानाबद्दलची खरी माहिती देण्याचाच हा प्रयत्न होता, असा खुलासा द्रविडने केला आहे.
मी खेळाडूंशी सातत्याने संवाद साधत असतो. प्रत्येक खेळाडू माझ्या मताशी सहमत असेलच असे नाही. अशा पद्धतीने गोष्टी घडत नाहीत. ज्यावेळी अंतिम 11 चा संघ निवडला जातो त्याआधी मी खेळाडूंबरोबर संभाषण करतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कायम प्रयत्न करतो. त्यांना संघात का स्थान मिळेले नाही, याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे असते. खेळाडू नाराज होणे आणि दुःखी होणे हे स्वाभाविक आहे. परंतु लगेच खेळाडूने माध्यमांशी थेट संवाद साधणे योग्य नाही, असेही द्रविड म्हणाले.