नवी दिल्ली – भारताची अव्वल महिला कुस्तीपटू अंशू मलिकने नॉर्वेत सुरू असेलल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आपले नाव विक्रमांच्या पुस्ताकत नोंदवताना रजतपदक पटकावले. या स्पर्धेच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अंशूला अमेरिकेची दोन वेळ ऑलिम्पिकपदक विजेती हेलेन मारोउलीसकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने रजतपदकावर समाधान मानावे लागले.
अंशू मलिक या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. तिने उपांत्य फेरीत ज्युनियर युरोपियन स्पर्धा विजेती सेलोमिया विंकचा पराभव केला होता. अंशूने उपांत्य फेरीतील लढतीत ज्या पद्धतीने वर्चस्व राखले होते ते पाहता अंतिम फेरीत तिच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. मात्र, ऑलिम्पिकपदक विजेत्या हेलेनाने अंशूला प्रतिकाराची संधीच दिली नाही.
अंशूच्या आधी भारताच्या चार महिला कुस्तीपटूंनी या स्पर्धेच्या इतिहासात पदके मिळवली आहेत. अंशूच्या आधी गीता फोगाट व बबिता फोगाटने 2012 साली, पूजा धांडाने 2018 साली तर, विनेश फोगाटने 2019 साली या स्पर्धेत ब्रॉंझपदकाला गवसणी घातली होती.
या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी अंशू ही सुशील कुमार व बजरंग पुनिया यांच्यानंतर भारताची तिसरी खेळाडू ठरली. या स्पर्धेत 2010 साली सुशील कुमारने पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले होते.