पुणे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चरने पुणे येथे 2 आणि 3 मार्चला एस. एल.
किर्लोस्कर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय उद्योग- व्यापार परिषद (बिझनेस समिट) आयोजित केली आहे. पुण्यात गुंतवणूक वाढावी या दृष्टिकोनातून ही परिषद आयोजित केली असल्याचे चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सांगितले. या परिषदेमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, तज्ज्ञ, विश्लेषक, उद्योजक आणि गुंतवणूकदार भाग घेतील आणि उद्योग क्षेत्रातील आगामी घडामोडीवर चर्चा करतील.
इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, जर्मनी, अमेरिका, बहरीन, इंडोनेशिया या देशांसह 13 देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील जागतिक बदल आणि त्यातील भारताची भूमिका, उद्योग, व्यापार या संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण व तंत्रज्ञान उपलब्धता या विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे. या परिषदेला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे गिरबाणे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यामध्ये कोणते उद्योग आणि सेवा जागतिक पातळीवर उपलब्ध आहेत याची माहिती या परिषदेत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये कोणते उद्योग आणि व्यवसाय स्थापन केले जाऊ शकतील याचा अंदाज या परिषदेमुळे येणार आहे. देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांसाठी ही परिषद उपयोगी पडणार आहे. यामुळे पुण्यातील संधी देशातील आणि परदेशातील उद्योजकांना माहीत होतील, असे गिरबाने यांनी सांगितले.