फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनची दहा टक्क्यांनी शुल्कवाढ ः विद्यार्थ्यांचा विरोध
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आठ वर्षांपूर्वीच दर दोन वर्षाला फोटोकॉपी व 2016 पासून सुरू झालेल्या पुनर्मूल्यांकनचे दहा टक्क्यांनी शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाने टप्पाटप्प्याने शुल्कवाढीची अंमलबजावणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आताही शुल्कवाढीस विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फोटोकॉपी व पूनर्मूल्यांकनसाठी प्रत्येकी 50 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यापीठाने जाहीर करताच शुल्कवाढीस विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध दर्शविला. शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे शुल्कवाढ ही परीक्षा विभागाची सत्त्वपरीक्षा ठरत आहे. दरम्यान, 2002 सालीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दर दोन वर्षांनी परीक्षा विभागासंबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क 10 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शुल्कवाढ केल्यास विरोध होणार हे लक्षात घेऊन तत्कालीन कुलगुरूंनी शुल्कवाढ करण्याचे टाळले.
दरम्यान, राज्यातील विद्यापीठांकडून मोठ्या प्रमाणात खर्च वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी जुलै 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विद्यापीठाने किमान उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये 20 टक्के वाढ करावी, असे आदेश दिले होते. त्याचे पत्र विद्यापीठांना पाठविण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठांनाही विद्यार्थी, उत्तरपत्रिका व खर्चाचा हिशोब करीत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने पुणे विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय विद्यापीठापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वाढीव शुल्काचा निर्णय तीनवेळा मागे
विद्यीपाठाने 2013 मध्ये उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी तब्बल 500 रुपयांचे शुल्क निश्चित केले होते. मात्र, त्यास विरोध होत असल्याने 2014 मध्ये 400 रुपये, 2015 मध्ये 250 तर 2016 मध्ये 100 रुपये करण्याचा निर्णय तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. त्यानंतर आता 150 आणि 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. त्यात आता 50 रुपयांनी शुल्कवाढीचा निर्णय झाला. हा निर्णयही विद्यापीठ मागे घेणार का, हेच आता पाहावे लागणार आहे.