लाहोर :-भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानने शुक्रवारी संघ जाहीर केला. काही खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावे लागणार असले तरीही आम्ही या स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडला आहे, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष व माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवाची मालिकाही खंडित करेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने यंदाच्या मोसमात आशिया करंडक स्पर्धा वगळता अन्य स्पर्धांमध्ये तसेच मालिकांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असून विश्वकरंडक स्पर्धेतही संघ यश मिळवेल, असा विश्वासही इंझमाम यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तान संघ :-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, सौद शकील, एम नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, उसामा मीर आणि वसीम जूनियर
राखीव: अबरार अहमद, मोहम्मद हारिस आणि जमान खान
पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध 29 सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या सामन्यात 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध लढत असणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.