पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रिता इंडिया फाउंडेशनच्या वतीने पुणे आणि अहमदनगर मध्ये अनामप्रेम संस्थेतील अंध आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी वित्तीय गुंतवणूक आणि संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे होते.
आधुनिक आणि सशक्त भारत या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच दिव्यांग बंधू भगिनींनी स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन अथवा गुंतवणूक कशी करावी, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
भविष्यातील वित्तीय संकटाना कशा प्रकारे सामोरे जावे, त्यासाठी गुंतवणूक कशात करावी? वेगवेगळ्या वित्तीय गुंतवणुकीचे लाभ कसे मिळवावेत, याबाबत ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थपिका आणि अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी घेतली.
या कार्यशाळेसाठी मुंबई, वसई येथील हॉसिंग पॉइंट ग्रुपचे संस्थापक रोहित शुक्ला आणि पुण्यातील विशाल मुसळे यांचे आर्थिक सहकार्य लाभले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. सविता शेटीया, मंगेश वाघमारे, कुमकुम लुंकड, अनामप्रेमचे अहमदनगर आणि सुखसागर नगरचे प्रकल्प समन्वयक अभय रायकवाड आणि ऋषिकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.