पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शहर परिसरात दुचाकी वाहने चोरणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हा फिरस्ता असून त्याने पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरांत दुचाकी चोरी केली आहे.
संतोष शिवराम घारे (रा. ओझरडे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. ज्या परिसरातून वाहने चोरीला गेली, त्या सर्व ठिकाणांची माहिती काढून पोलिसांनी तांत्रिक तपास केला.
सीसीटीव्हींची तपासणी करून आरोपीचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा आळंदी, देहू, चाकण भागांत शोध घेतला. दरम्यान, संशयित वाहनचोर हा पुणे स्टेशन भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानसार घारेला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या 25 दुचाकी जप्त करून विश्रामबाग, शिवाजीनगर, तळेगाव दाभाडे, भोसरी, सांगवी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील 25 गुन्ह्यांची उकल केली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बोरूरे, सहायक पोलिस फौजदार राकेश गुजर, रेवण कंचे, मयूर भोसले, अशिष खरात, अशोक माने, महावीर वलटे, राहुल मोरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.