मुंबई – कर्नाटकात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी अमित शहांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सर्व ताकद पणाला लावली आहे. कारण कर्नाटक निकालाचा इतर राज्यातील विधानसभा निकालांवर देखील परिणाम होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल बेळगावात प्रचार केला. यावेळी राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली. यानंतर या टीकेला भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रतित्युत्तर दिल आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती’चे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारात संजय राऊत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले,”“भाजपावाले कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते पक्के मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. त्यांना मराठी माणसाचा आवाज बुलंद झालेला दिसला की ताबोडतोब कारस्थानं करतात. मग तो महाराष्ट्र असो किंवा सीमाभाग असो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
यासोबतच सीमाभागाविषयी आणि तेथील अमराठी भाषिकांबाबत देखील यावेळी राऊत यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. यासह भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. त्या देखील कर्नाटकात भाजपच्यावतीने प्रचार करताना दिसल्या.
यावेळी चित्र वाघ यांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेत टीका केली आहे. वाघ यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात,”गैरव्यवहारात जेलची हवा खाऊन आलेल्या आरोपीला प्रचारात उतरवण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आलीय.. अहो सर्वज्ञानी, लाज तर तुम्हाला वाटायला पाहीजे.. तुम्ही तर उद्धव ठाकरेंना कांग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं.. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. शिवसेना फोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम राऊतांनी केलंय.. आता ते सुपारी घेऊन आलेत..बेळगावांत भडकावू भाषण देऊन दंगे घडवण्याचं काम सर्वज्ञानी करताहेत. “