पुणे – कर्मचारी-अधिकारी बदली धोरणाला अधिकाऱ्यांकडूनच खो घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे महापालिकेच्या लेखनिक प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी कामाला एका खात्यात आणि त्यांचे मासिक वेतन दुसऱ्याच खात्याकडून या पद्धतीने काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे यातील कर्मचारी मूळ खाते सोडून कर आकारणी आणि करसंकलन विभागात काम करत आहेत.
दरम्यान, कर आकारणी आणि कर संकलन विभागात हे कर्मचारी महिनोंमहिने काम करत असतील तर मिळकतकराची प्रचंड थकबाकी कमी का होत नाही? थकबाकी वसुलीसाठी महापालिकेला अभय योजना राबविण्याची वेळ का येते? तसेच ज्या खात्यांमध्ये कर्मचारी पगारासाठी कागदोपत्री दाखविले जात आहेत, त्या विभागाचे या कर्मचाऱ्यांवाचून अडत कसे नाही? या परिस्थितीत बदलीनंतर मूळ खात्यामधील पद रद्द का करण्यात येत नाही, अशी विचारणा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.