महिलेकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

राजगुरूनगर बसस्थानकात गर्दीचा फायदा उचलत बसमध्ये चढणाऱ्या महिलांचे दागिने लांबवत होती

राजगुरूनगर- येथील एसटी बस स्थानकात महिलांचे सोन्या चांदीचे दागिने, पर्स गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या एका 39 वर्षीय महिलेला खेड पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 7 तोळे वजनाची महिलांची चोरलेली मंगळसूत्रे व सोन्याचे दागिने असा तब्बल 2 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, या महिलेला गुरुवारी (दि. 28) पोलिसांनी ताब्यात घेतले होते; तर तिने दागिने चोरीची कबुली दिली असल्याने सोमवारी (दि. 2) पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

लक्ष्मी बढेकर (वय 39 रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. राजगुरूनगर एसटीबस आगारात बसमध्ये चढताना व भाजी बाजारात अनेकदा महिलांचे दागिने चोरण्याचा घटना घडल्या आहेत.

दरम्यान, महिनाभरात राजगुरूनगर बस स्थानकात बसमध्ये चढताना सर्वाधिक चोऱ्या घडत होत्या. सीसीटीव्ही आणि पोलीस गस्त वाढवूनही हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र, गुरुवारी (दि. 28) बस स्थानकात गस्त घालत असताना पोलिसांना संशयित महिला आढळून आली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी तिला पोलीसी खाक्‍या दाखवताच तिने राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी रमेश ढोकले, राजेश नलावडे, बाळकृष्ण साबळे, संतोष मोरे, संजय नाडेकर, विजय सर्जीने, शिवाजी बॅंकर, विकास पाटील, नीलम वारे यांनी ही कामगिरी केली आहे.

  • चेन स्नॅचर, बतवणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान
    राजगुरूनगर शहरात घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला 12 ऑक्‍टोबरला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 8 तोळे वजनाचा सोन्याचे व 500 ग्रॅम चांदी दागिने हस्तगत केले होते. तर गुरुवारी (दि. 28) गर्दीत बसमध्ये चढताना महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुरुषांबरोबर महिला चोरीच्या व्यवसायात उतरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. तर आता पोलिसांसमोर चैन स्नॅचर व पोलीस असल्याची बतावणी करवूनऐवज लुटाळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.