पाचगणी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वरमधील महिलांनी बुधवारी उत्साही वातावरणात भव्य शोभायात्रा काढली. महिलादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाबळेश्वर पालिकेच्या प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुनव्वर हौसिंग सोसायटी, गणेशनगर हौसिंग सोसायटी, गवळी मोहल्ला,रामगड, कोळी आळी, माळी आळी, मुख्य बाजारपेठ, रांजणवाडी व शहराच्या अन्य भागांमधील महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या. शहरातील मुख्य बाजारेठेतून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. महिलांनी तयार केलेले चित्ररथ व त्यावरील नयनरम्य देखाव्यांमुळे शोभायात्रेला साज चढला होता. छत्रपती शिवरायाच्या जन्मोस्तवाचा देखावा असलेला चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. “जय भवानी, जय शिवाजी’, “तुकोबा ज्ञानोबा’ असा जयजयकार करण्यात येत होता. स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणाही देण्यात आल्या. महिला दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील महिलांची रॅली, महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मिस महाबळेश्वर व मिसेस महाबळेश्वर, हसण्याचा बूस्टर डोस, मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.