पिंपरी – पती त्रास देत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेशी झीरो पोलिसाने मैत्री केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी त्या झीरो पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 29 वर्षीय महिलेने 24 नोव्हेंबर 2019 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.सागर विलास वाघमारे (रा. पुनर्वसन बिल्डिंग, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो वाकड पोलीस ठाण्यात झीरो पोलीस म्हणून कार्यरत होता. मार्च 2019 मध्ये फिर्यादी पतीशी भांडण झाले म्हणून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली होती. त्या वेळी झीरो पोलीस म्हणून ठाण्यात असलेल्या सागर याने महिलेशी ओळख करून घेत तिचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर तो त्या महिलेशी व्हॉटस्ऍपवर संभाषण करून आरोपी वाघमारे हा आपल्याला मदत करतो आहे म्हणून ती महिलाही त्याच्याशी संवाद करू लागली. तुझा नवरा तुला त्रास देत आहे ना, मग मी तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतो, असे आश्वासन दिले. गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाला तरी पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
दरम्यान पीडित महिलेने 2 डिसेंबर 2019 रोजी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामध्ये काही कारणास्तव आपण सागर गोरे याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. तसेच आपण गुन्हा माघार घेत आहे. आरोपी सागर आणि आपला यापुढे कोणताही संबंध असणार नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.