- स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अंतर्गत कलह
- ऍड. नितीन लांडगे यांचे नाव निश्चित
- रवी लांडगे नाराज, दिला स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा
पिंपरी – स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेच आता अंतर्गत कलहापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ऍड. नितीन लांडगे यांचे नाव निश्चित होताच
नगरसेवक लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे भाजपमध्ये आता लांडगे विरूद्ध लांडगे असे चित्र पहावयास मिळत आहे.
भाजपतर्फे ऍड. नितीन लांडगे यांचा अर्ज भरण्यात आल्याने जुने निष्ठावंत आणि तीव्र इच्छुक नगरसेवक रवी लांडगे यांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा महापौर माई ढोरे यांच्याकडे सुपूर्द केला. तिकडे स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रवीण भालेकर यांनी अर्ज भरून भाजपच्या उमेदवाराला आव्हान निर्माण केले आहे.
स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी येत्या शुक्रवारी (दि. 5) दुपारी 12 वाजता होणाऱ्या विशेष सभेत ऍड. लांडगे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब अपेक्षित आहे. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत.
मंगळवारी नगरसचिव कार्यालयात अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत मुदत दिलेली होती. दिलेल्या मुदतीत भाजपतर्फे ऍड. नितीन लांडगे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रवीण भालेकर यांनी एक अर्ज भरला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रभारी माधुरी मिसाळ यांच्यातर्फे ऍड. लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार ऍड. लांडगे यांनी अर्ज भरला. ऍड. लांडगे हे 2012 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपने संधी दिल्यानंतर पक्षामध्ये अंतर्गत बंडाळीला सुरूवात झाली आहे.
आमदारांनी शब्द पाळला नाही
ऍड. नितीन लांडगे यांचे भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर लगोलग रवी लांडगे यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊ केला. मला डावलण्यात आले असून आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका त्यांनी केली. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे पक्षात खच्चीकरण केले जात आहे. आपल्याला डावलण्याची कारणे समजल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे लांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एकाच प्रभागात दुसऱ्यांदा अध्यक्ष पद
भोसरीतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संतोष लोंढे यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या पाठोपाठ त्याच वॉर्डातील नगरसेवक ऍड. नितीन लांडगे यांचे नाव निश्चित केल्याने एकाच वॉर्डामध्ये दुसऱ्यांदा स्थायीचे अध्यक्ष पद जाणार आहे.
भोसरी विधानसभेत चौथ्यांदा पद
भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये ऍड. नितीन लांडगे यांच्या रूपाने चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पद जाणार आहे. यापूर्वी भोसरी मतदारसंघातील सीमा सावळे, विलास मडिगेरी, संतोष लोंढे यांना संधी मिळालेली आहे. तर, चिंचवड मतदारसंघातील ममता गायकवाड स्थायी समितीच्या अध्यक्षा झालेल्या आहेत.
भाजपला जड जाऊ शकते निवडणूक
राष्ट्रवादीकडूनही स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आल्याने बेरजेचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे सध्या स्थायी समितीमध्ये 4 सदस्य आहेत. महाविकास आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेच्या एका सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा असणार आहे. रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने भाजपचे संख्याबळ एक सदस्याने कमी झाले आहे. राष्ट्रवादीला बहुमतासाठी 4 सदस्यांची मते कमी पडत आहेत. ही मते खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते.