रेडा – राष्ट्रीय समाज पक्षाच्या सहकार्याशिवाय राज्यात युती सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. आम्ही युतीकडे विधानसभेच्या 52 जागांची मागणी केली आहे, असे प्रतिपादन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या चारा छावणीस मंत्री जानकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव दिलीप ढोले, उपसरपंच कमल रसाळ, हर्षवर्धन खाडे, बाळासाहेब करगळ, दादासाहेब केसकर, किरण गोफणे, श्रीनिवास सातपुते, पोपट क्षीरसागर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जानकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून या छावणीची ओळख आहे. चारा छावण्यांच्या अनुदानाची 28 कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्ह्यधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत पैसे छावण्यांना मिळतील. प्रतिष्ठानचे शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शानुरखान पठाण यांनी यांनी केले. सरपंच सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानले.