नवी दिल्ली – भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोच्या शेअरचा ( Wipro Share Price) भाव आज दिवसभर अस्थिर राहिला. बाजार बंद होताना या कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने कमी होऊन 479 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. सकाळी शेअर चा भाव बराच कमी झाला होता. मात्र त्यात नंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. यामुळे विप्रोचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2,733 कोटी रुपयांनी कमी होऊन 2.5 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
गेल्या आठवड्यात विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी डेलापोर्ट यांनी राजीनामा दिला. थियरी डेलापोर्ट यांच्या जागी कंपनीने श्रीनिवास पल्लिया यांची कंपनीचे नवीन सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.
थियरी डेलापोर्ट हे गेली चार वर्षे विप्रोसोबत होते. आता त्यांना आपला व्यवसाय करायचा आहे, म्हणून त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. थियरी यांना चार वर्षांपूर्वी विप्रोचे नेतृत्व करण्यासाठी फ्रेंच टेक कंपनी कॅपजेमिनीकडून आणण्यात आले होते. थियरीचा कंपनीतील शेवटचा दिवस 31 मे 2024 असेल.
श्रीनिवास पल्लिया हे 1992 पासून विप्रोसोबत आहेत आणि त्यांनी अनेक नेतृत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी विप्रोच्या कंझ्युमर बिझनेस युनिटचे अध्यक्ष आणि बिझनेस ऍप्लिकेशन सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड म्हणूनही काम केले आहे. 2008 मध्ये, बिझनेस टुडेने भारतातील टॉप 25 यंग बिझनेस एक्झिक्युटिव्हमध्ये श्रीनिवास पल्लिया यांचा समावेश केला.
विप्रोच्या अधिकृत वेबसाइटनुसार, श्रीनिवास पल्लिया यांनी आयआयटी बंगलोरमधून इंजिनीअरिंग आणि मास्टर इन मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या लीडिंग ग्लोबल बिझनेस प्रोग्राम आणि मॅकगिल एक्झिक्युटिव्ह इन्स्टिट्यूटमधील प्रगत लीडरशिप प्रोग्राममध्ये देखील शिक्षण घेतले आहे.