नवी दिल्ली – येत्या हिवाळ्यासाठी विमान कंपन्यांनी प्रती आठवडा किती उड्डाणे (फ्लाईट्स) करायची, याबबतचे वेळापत्रक डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी जाहीर केले आहे. यावर्षी विमान कपन्यांना 12,983 डोमेस्टिक फ्लाइटसची मंजुरी मिळाली असून हे वेळापत्रक 25 अक्टोबरपासून वर्ष 2021 च्या 27 मार्चपर्यंत चालेल. यावर्षी करोनाव्हायरसच्या प्रभावामुळे नागरी उड्डाणांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 44% कमी आहे. गेल्यावर्षी याच हंगामासाठी 23,307 देशांतर्गत उड्डाणांना मंजूरी देण्यात आली होती.
डीजीसीएने रविवारी सांगितले की, देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला 6,006 फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे. तर स्पाइस जेटला 1,957 आणि गो एयरला 1,203 फ्लाईट्स देण्यात आल्या आहेत. सरकारी कंपनी एअर इंडियाला 1126 उड्डाणे आणि त्याच्या प्रादेशिक विमान कंपनी एलायन्स एअरला 610 उड्डाणांची मान्यता मिळाली आहे.
ही उड्डाणे देशातील 95 विमानतळांवरून चालवली जातील. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सध्या विमान कंपन्यांना देशात जास्तीत जास्त 60% उड्डाण संचालनास परवानगी आहे. कोरोनामुळे भारतात दोन महिन्यांसाठी विमान कंपन्यांवर बंदी घालण्यात आली होती. 25 मे रोजी काही निवडक महत्त्वाची देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी विमान कंपन्यांना फक्त 33% उड्डाणे चालवण्याची परवानगी होती.