मुंबई – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया आदी कारणांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडले आहे. हे अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस नागपूर ऐवजी मुंबईत होण्याची चिन्हे आहेत.
या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरलाच व्हावे भाजपचे नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे हे अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही आहे.
जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, नियोजित अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही.
अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. अधिवेशनाला जेमतेम 15 दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्यावे, असे एकमताने ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे प्रस्ताव ?
या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे या हिवाळी अधिवेशनाचा प्रस्ताव बैठकी ठेवतील. यानंतर हे अधिवेशन नागपूर की मुंबईत व्हावे यावर चर्चा करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार हे हिवाळी अधिवेशन 14 ते 24, 17 ते 26, 20 ते 29 डिसेंम्बर या कालावधीत घेण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहे. या बैठकीनंतर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा निर्णय घेण्यात येईल.