मंचर/पारगाव शिंगवे – दत्तात्रयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार 2 हजार 613 रुपये प्रति मेट्रिक टन एकरकमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले, गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार गाळप हंगाम 2021-22 मध्ये उसास एफआरपीनुसार 2 हजार 613 रुपये प्रति मेट्रिक टन एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिला आहे. पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली आहे.
या हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने हार्वेस्टर, ट्रक /ट्रॅक्टर टोळीसह, टॅक्टर टायरगाडी व बैलटायरगाडी यांचे करार केले असून आतापर्यंत 1 लाख 59 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 9.95 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 1 लाख 55 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन बेंडे यांनी केले.
भीमाशंकर कारखान्याने एफआरपी दराबाबतची कोंडी फोडली
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मधील गाळप होणाऱ्या ऊसास एफआरपी देण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही; परंतु भीमाशंकर कारखान्याने एफआरपी कोंडी फोडून एकरकमी 2 हजार 613 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.