लंडन – विम्बल्डन या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचे संयोजक असणाऱ्या ऑल इंग्लंड क्लबने शनिवारी रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवरील बंदी उठवत त्यांना तटस्थ झेंड्याखाली स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. तसेच खेळाडूंना, ते रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे समर्थन करणार नाहीत या अटीसह स्पर्धा खेळण्याची अनुमती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर आक्रमन केल्यानंतर ऑल इंग्लंड क्लबकडून रशियासह बेलारूसच्याही टेनिसपटूंवर बंदी घालण्यात आली होती.
टेनिसपटू त्यांच्या देश रशिया आणि बेलारूसकडून निधीही घेणार नाहीत, अशी अटकळही ऑल इंग्लंड क्लबने घातली आहे. इतर टेनिस स्पर्धांमध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना तटस्थ खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाने आता प्रतिष्ठित विम्बल्डनमध्येही त्यांना खेळता येणार आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला 3 जुलैपासून सुरुवात होणार आहे. महिला एकेरीचा अंतिम सामना 15 जुलैला तर पुरुष एकेरीचा अंतिम सामना 16 जुलैला होणार आहे.
गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना राष्ट्रध्वज, प्रतीके वापरण्यास आणि राष्ट्रगीत गाण्यास बंदी घातली होती.
युक्रेनवर हल्ला करण्यासाठी बेलारूस रशियालाही मदत करत आहे. दुसरीकडे, भारतातील जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मात्र रशिया आणि बेलारूसच्या बॉक्सरांना आपापल्या ध्वजांसह खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.