सोलापूर : सोलापुरात गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. मात्र आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्यास तात्पुरता दिलासा मिळाला आहे. गुरुवारी संध्याकाळनंतर आज सकाळपर्यंत सोलापुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत 93 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1144 वर पोहोचला होता. आज सकाळी रुग्णाची वाढ न झाल्याने तीच आकडेवारी कायम राहिली आहे.
सोलापुरात आज सकाळपर्यंत एकूण 8304 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7162 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आढळले आहेत. तर 1144 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 99 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे.
मृतांमध्ये बहुतांश रुग्ण हे वृद्ध आहेत तर कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी देखील ग्रस्त होते. समाधानाची बाब म्हणजे 484 रुग्ण हे योग्य उपचारामुळे बरे देखील झाले. त्यामुळे उर्वरित 561 रुग्णांवर सोलापुरातील विविध कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.