कानपूर – उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 80 जागा जिंकण्यासाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये आला आहे. सर्वाधिक जागा असलेल्या यूपीमध्ये एक वर्ष आधी म्हणजे येत्या 20 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाहून अधिक कालावधी आहे, पण भाजप निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाला आहे. त्यामुळे अन्य पक्षांत खळबळ माजली आहे.
लोकसभेच्या 80 जागांसह उत्तर प्रदेशसाठी भाजपने विशेष योजना आखली आहे. उत्तर प्रदेश भाजप नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून लखनौमध्ये सतत बैठका घेतल्या आहेत. सभांनंतर भाजप 20 जानेवारीपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जेपी नड्डा यांनी यूपीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठका घेतल्या आहेत.
20 जानेवारीला जेपी नड्डा गाझीपूरमध्ये मोठी जाहीर सभा घेणार आहेत. वर्ष 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जात आहे. वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा चेहरा मनोज सिन्हा गाझीपूरमधून बसपच्या अफजल अन्सारी यांच्याकडून निवडणूक हरले होते.
भाजपने मागील वर्ष 2019 च्या निवडणुकीत गमावलेल्या सर्वच जागांवर पक्षाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच पहिल्याच प्रचारसभेसाठी गाझीपूरची निवड करण्यात आली आहे. मिशन पूर्वांचल युपी गाझीपूरमधील नड्डांच्या जाहीर सभेपासून सुरू होईल. जेपी नड्डा यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 30 जानेवारीला उत्तर प्रदेशात येणार आहेत. अमित शाह आंबेडकरनगरमध्ये कार्यक्रम करणार असून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर व्यापक मोहिमा राबवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.