नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाच्या पुढच्या पंतप्रधान बनू शकता, या नोबेल पारितोषिक विजेते आणि प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सध्या तरी देशात पंतप्रधानपदासाठी एकही जागा रिक्त नाही.
त्यामुळे आगामी वर्ष 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच जिंकेल आणि पंतप्रधान बनण्याचे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळेल. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, लोकशाहीत मत व्यक्त करण्यास कोणालाच प्रतिबंध नाही. पण गेल्या दोन टर्मपासून जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला आहे. वर्ष 2024 च्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होईल.
तसेच गरीब, महिला, तरुण, मागास आणि ग्रामीण जनतेने देश चालवण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर सोपवली आहे. देशातील जनतेने नरेंद्र मोदींवर सलग दोनदा विश्वास दाखवला आहे. 2024 मध्येही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचा विजय होईल, असा दावा त्यांनी केला.