मुंबई – सरलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात भरपूर खरेदी झाली. गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याचे कारण म्हणजे कंपन्यांचे चांगले ताळेबंद, समाधानकारक पाऊस, जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश, परकीय गुंतवणूकदाराकडून सुरू झालेली खरेदी, कच्च्या तेलाचे कमी होत असलेले दर हे आहे.
मात्र याच आठवड्यामध्ये युरोपच्या रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात बऱ्याच वर्षानंतर वाढ केली. त्याचबरोबर रुपयाचे घसरणे चालूच राहिले. शिवाय पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात पाऊण टक्के वाढ करणार आहे. या बाबीकडे गुंतवणूकदाराने दुर्लक्ष केलेले दिसते. सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 4.19 टक्क्यांनी म्हणजे 2,311 अंकांनी वाढून 56,072 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 4.17 टक्क्यांनी म्हणजे 670 अंकांनी वाढून 16,719 अंकावर बंद झाला.
जुलै महिना शेअर बाजारासाठी काही प्रमाणात चांगला गेला आहे. या महिन्यात आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ सहा टक्क्यांनी वाढले आहेत. या आठवड्यात झालेल्या खरेदीचा फायदा सरकारी बॅंका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, खासगी बॅंक, धातू इत्यादी क्षेत्रातील कंपन्या कंपन्यांना झाला. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये गुंतवणूकदारांनी छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी केल्यामुळे स्मॉल कॅप आणि मिडकॅप चार टक्क्यांपर्यंत वाढले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या घडामोडीचे तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या विश्लेषकांनी सांगितले की, आठवड्याच्या पातळीवर निफ्टी वाढला आहे. त्याचबरोबर आगामी आठवड्यात निफ्टीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीला खालच्या पातळीवर 16,500 वर चांगला आधार आहे. तर खरेदी वाढत गेली तर निफ्टी 16 750 अंकापर्यंत वाढू शकतो असे अनेकांना वाटते.
या आठवड्यातील कामकाजाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे छोट्या 100 कंपन्यांच्या शेअरच्या भावात 10 ते 32 टक्क्यापर्यंत वाढ झाली. सरलेल्या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 4,037 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी नवाज 940 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
आता पुढील आठवड्यामध्ये फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीवर देशातील गुंतवणूकदार आणि परदेशातील गुंतवणूकदार काय भूमिका घेतात यावर निर्देशांकांची वाटचाल अवलंबून राहणार आहे. व्याजदरात वाढ होणार असूनही या आठवड्यात ज्या अर्थी गुंतवणूकदारांनी खरेदी केली आहे. त्या अर्थी आगामी काळातही गुंतवणूकदार खरेदीच्या मनस्थितीत राहतील असे अनेकांना वाटते.