पिंपरी – वैद्यकीय शिक्षण कमी खर्चात होत असल्याने युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडचे काही विद्यार्थी गेले होते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दामुळे शहरातील 27 विद्यार्थी युक्रेनवरून परत आले आहेत. मात्र, युद्धभूमी युक्रेनमधील वातावरण कधी शांत होणार? तेथील परिस्थिती कधी पूर्ववत होईल, आपण पुन्हा युक्रेनला जाऊ की नाही? आपल्या डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होईल की नाही, याबाबत काही विद्यार्थ्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असले तरी परीक्षा, प्रॅक्टीकल आणि भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करण्यासाठी भारतातील परीक्षा हे सर्व कसे पार पडणार असे प्रश्न त्यांना पडत आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी युध्दाची ठिणगी पडली. 21 दिवसांनंतरही युध्द सुरू आहे. युध्दाला सुरूवात होताच भारत सरकारने शिक्षणासाठी आणि इतर कारणासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी मिशन गंगा हे ऑपरेशन राबविले. या अंतर्गत शहरातील 27 विद्यार्थी सुखरूपपणे मायदेशी परतली आहेत.
वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनला पसंती देत आहे. शहरातील भोसरी, पिंपरी, निगडी, वाकड, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी, जुनी सांगवी, चिंचवडगाव, जुनी सांगवी, वाल्हेकरवाडी, मोशी या भागातील मुले युक्रेनला शिकण्यासाठी गेली होती. तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून शहरात परतली आहेत.
यामधील अनेक मुले एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या तर काही मुले अंतिम वर्षाला ंआहेत. आपण पुन्हा युक्रेनला शिक्षणासाठी जाऊ की नाही, याबाबत विद्यार्थ्यांना साशंकता वाटत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याच्या भवितव्याची आणि विद्यार्थ्यांना आपल्या डॉक्टरकीचे स्वप्न साकार होईल की नाही, याबाबत चिंता सतावत आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने युक्रेनमधून परतलो आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षण सुरू झाले असताना अचानक परतावे लागले आहे. तेथील परिस्थिती कधी शांत होईल, याची प्रतीक्षा आहे. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. दोन दिवसांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, युक्रेनला परत कधी जाता येईल, याची काळजी वाटत आहे.
-आशिष समुद्र.