Raj Thackeray । महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलत असल्याचे दिसत आहे.
आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे महायुतीत येणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray । नेमकं काय म्हणाले रोहित पवार
‘राज ठाकरे जर २०१९ प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढले तर त्यांच्याबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही.’
ते पुढे म्हणाले,’आज लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. आज लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. तसंच महाराष्ट्राच्या बाजूने लढणं महत्त्वाचं आहे.’ असेही ते म्हणाले आहे.