बंगळुरू -कॉंग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. डावे पक्ष नाराज होऊ नयेत यासाठी राहुल केरळमधील मतदारसंघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल मागील वेळी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्या राज्यात डाव्या पक्षांची सत्ता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ताकदीने लढण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया या देशव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. त्या आघाडीत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश आहे. त्यामुळे यावेळी केरळमधील राजकीय समीकरणे लोकसभा निवडणुकीत बदललेली दिसतील.
त्या निवडणुकीला कॉंग्रेस आणि डावे मित्रपक्ष म्हणून सामोरे जातील. त्याकडे लक्ष वेधून डाव्या पक्षांनी राहुल यांनी केरळमधून लढू नये अशी भूमिका घेतली आहे. राहुल यांनी भाजपचे प्रमुख आव्हान असणाऱ्या राज्यातून निवडणूक लढवावी, असे डाव्यांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांनी कर्नाटकचाही पर्याय सुचवला आहे.