मुंबई – कॉमेडिस्टार कपिल शर्मा त्याच्या शोमुळे घराघरात प्रसिद्ध आहे. त्याच्या शोला मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात. कपिलच्या शोमध्ये सिनेविश्वातील अनेक स्टार्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. कपिल ऑन द स्पॉट कॉमेडी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोमध्ये आमंत्रित केलं असल्याचा खुलासा केला. यावर पंतप्रधान काय म्हणाले हे देखील कपिलने यावेळी सांगितले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माने सांगितले की, तो एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिकरित्या भेटला होता. त्यादरम्यान त्याने पीएम मोदींना त्यांच्या कॉमेडी शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले सध्या विरोधक खूप कॉमेडी करत आहेत. शोमध्ये येण्याबाबत विचार करू असा खुलासा कपिलने यावेळी केला. तसेच पंतप्रधान शोमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल असंही कपिल यावेळी म्हणाला.
कपिल म्हणाला की संपूर्ण जगाने पीएम मोदींचा विनोदी अंदाज देखील पाहावी अशी माझी इच्छा आहे.मुंबईतील सिनेमा संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी, पीएम मोदींनी चित्रपट उद्योगातील सदस्यांना संबोधित केले त्यावेळी त्यांची विनोदी शैली देखील सर्वांसमोर आली होती. माझी इच्छा आहे की त्यांनी काही काळ माझ्या शोमध्ये यावे आणि आपला वेगळा अंदाज सर्वांना माहिती करून द्यावा असं कपिल म्हणतो. तसेच यासाठी पुन्हा वारंवार प्रयत्न करत राहणार असलयाचे देखील कपिलने यावेळी सांगितले.
खरंतर कपिल शर्मा नेहमीच चर्चेत असतो. तो आता त्याच्या आगामी ‘झ्विगाटो’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे जो 17 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते या अभिनेत्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.