चंदिगढ – केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे पंजाबातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून या अन्यायाच्या पुढे झुकण्याऐवजी आपण राजीनामा देण्यासही मागे पुढे पहाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंह यांनी म्हटले आहे.
केंद्राच्या या कायद्यांमुळे राज्यातील स्थैर्य आणि शांततेला धोका निर्माण होत असून त्यातून राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही अत्यंत सक्तपणे केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात आहोत. यामुळे आमचे सरकार बरखास्त केले तरी आम्ही केंद्रापुढे या प्रकरणात झुकणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्यावेळी शिखांच्या प्रतिष्ठेवर झालेल्या हल्ल्याचा प्रकरणातही आपण त्यावेळी राजीनामा दिला होता, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात चार नवीन विधेयके विधानसभेत सादर केली. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या या विषयाच्या संबंधात चर्चा करण्यासाठी पंजाब सरकारने विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या विधेयकांमुळे पंजाबातील शेतकरी इतका अस्वस्थ झाला आहे की पंजाबात 80 आणि 90 च्या दशकात जशी अस्वस्था निर्माण झाली होती तशीच स्थिती याहीवेळी निर्माण झाली आहे. शेती विधेयकाच्या माध्यमातून पंजाबला संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारच्या शेतीविषयक विधेयकांमुळे येथील शेतकऱ्यांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे ती भीती आम्ही येथे मांडलेल्या चार नवीन प्रस्तावांमुळे नाहीशी होणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.