बीजिंग – भारत, अमेरिका, जपानबरोबरच्या मलाबार युद्धसरावामध्ये ऑस्ट्रेलियाही सहभागी होणार असल्याच्या वृत्ताची आपण दखल घेतली असल्यची प्रतिक्रिया चीनने दिली आहे. “क्वॉड’ गटाचे सदस्य म्हणून हे चारही देश बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात पुढच्या महिन्यात होणाऱ्या या सागरी युद्धसरावामध्ये सहभागी होणार आहेत. या युद्धसरावातून चीनला थेट इशारा दिला जाणार आहे.
चीनबरोबरचा सीमेवरील तणाव वाढलेला असताना भारताने या युद्धसरावामध्ये सहभागी होण्यास ऑस्ट्रेलियाला विनंती केली होती. चीनबरोबरच्या संभाव्य तणावाला तोंड देण्यासाठी सांघिक युद्धकौशल्य आवश्यक असू शकते. ही बाब लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियानेही या युद्धसरावामध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
यावर भाष्य करताना “चीनने याची दखल घेतली आहे.’ अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. देशांमधील लष्करी सहकार्य प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी अनुकूल असले पाहिजे, असाच आमचा विश्वास आहे, असे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.
सैनिकाची सुटका होण्याची चीनला आशा
पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याने पकडलेल्या सैनिकाला लवकरच सोडण्यात येईल, अशी आशा चिनी सैन्याने व्यक्त केली आहे. पूर्व लडाखच्या डेमचॉक सेक्टरमध्ये सोमवारी अटक करण्यात आली जेव्हा हा चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भरकटला होता. वॅंग या लो असे या चिनी सैनिकाचे नाव असून औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याला चुकुल-मोल्दो सीमेवर चीनी सैन्याच्या स्वाधीन करण्यात येईल, भारतीय लष्कराने सोमवरी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले होते.