नजीकच्या भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहणार
नवी दिल्ली -देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक राजकारणात प्रवेश करत आहेत. पण रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारणात येण्याचा किंवा कोणताही राजकीय पक्ष सुरू करण्याचा कोणताही विचार नाही.
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, लोकसभा निवडणुकीत जर विरोधी पक्षांचे सरकार आले तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, रघुराम राजन यांनी आपल्यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
आपण जिथे आहोत तिथे सुखी आणि समाधानी असून राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच रघुराम राजन यांना राजकारणात आल्यास कौटुंबिक आयुष्यात समस्या निर्माण होतील असे वाटत आहे. राजकारण सगळीकडून सारखंच असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
रघुराम राजन यांनी आपले पुस्तक द थर्ड पिलरच्या प्रकाशनावेळी सांगितले होते की, मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे. पण माझ्यासाठी एखादी संधी असेल तर मला तिथे उपस्थित राहायला आवडेल. रघुराम राजन सध्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवत आहेत.