नगर – महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनपाला पूर्णवेळ आयुक्त मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, जिल्हाधिकारी द्विवेदी हे पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा तणावग्रस्त झाले आहे.
घन:श्याम मंगळे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमारे सहा महिने आयुक्तपद रिक्त होते. त्या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच महापालिकेचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. त्यात महापालिकेची निवडणूक देखील शांततेत करून दाखविली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त व वेळेच्या नियोजनाचे धडे कृतीतून दिले. पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक कळला. सीना नदीचा श्वास मोकळा झाला होता.
आता पुन्हा महापालिकेचे आयुक्तपद एक डिसेंबरपासून रिक्त होत आहे. यात प्रशासकीय कामे वाढली आहेत. महापालिकेत आयुक्तपदावर येण्यासाठी अधिकारी तयार होत नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे महापालिकेचा पदभार पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. नगर महापालिकेतील राजकीय व आर्थिक स्थितीची ओळख राज्यभरातील सर्व सनदी अधिकाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे महापालिकेत येण्यास सनदी अधिकारी तयार होत नाहीत. गेल्या दीड वर्षापासून नगर महापालिकेतील अपर आयुक्तांची खुर्ची त्यामुळेच रिक्त आहे. मध्यंतरी बरेच दिवस आयुक्त व दोन्ही उपायुक्तांच्या खुर्च्याही रिक्त होत्या.