पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेल वाहने आहेत. मात्र, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल वापरासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनानुसार महापालिकेच्या वाहनांमध्ये यापुढे इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर करण्यात येणार असून 2022-23 च्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
देशातील वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत अनेक नागरिक इलेक्ट्रिक व्हेईकलला प्राधान्य देत आहे. तसेच राज्य सरकारनेही आपल्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी इलक्ट्रिक व्हेईकल वापरण्यास सुरूवात केली आहे. आता महापालिकेच्या वाहनांमध्ये यापुढील काळात इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांनी जर इलेक्ट्रिक व्हेईकल घेतली तर त्यांना 10 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात महापालिका प्रशासनाला आवश्यकता भासल्यास इलेक्ट्रिक गाड्याच भाड्याने घेण्यात येणार आहेत.