नगर – नगरच्या वाडियापार्क स्टेडीयमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल केले जाईल,अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी आम्ही दोघे मिळून तो मंजूर करू, असे स्पष्ट करताना, पुढच्या वर्षीच्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा याच आंतरराष्ट्रीय स्टेडीयममध्ये झाल्या पाहिजे, असेही आवर्जून सांगितले.
भाजप, मुख्यमंत्र्यांची शिवसेना व जिल्हा तालिम संघाने येथील वाडियापार्क मैदानावर आयोजित केलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष व आ. प्रा. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, प्रसिद्ध कुस्ती मार्गदर्शक काका पवार, संजय सिंग, योगेश दोडके तसेच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पहिले कुस्तीचे ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. मात्र, नंतर आपण कुस्तीमध्ये अजूनपर्यंत पदक मिळवू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करून फडणवीस म्हणाले, पहिलवानांच्या मानधनात आपण तीन हजारावरून 18 हजार अशी वाढ केली, स्पर्धांची बक्षिसेही वाढवली. महाराष्ट्र केसरी तीनवेळा जिंकणाऱ्यास थेट पोलिस उपअधीक्षक नोकरीही दिली आहे. आणखीही कुस्तीपटूंना नोकऱ्या दिल्या जातील. पण महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू तयार झाला पाहिजे. कुस्तीमध्ये मॅट व माती असे दोन आखाडे असले तरी माती अंगाला लावल्याशिवाय विजय संपादन करता येत नाही व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व नगर जिल्हा तालिम संघही चांगली कामगिरी करीत आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर यांनी प्रास्ताविकात नगरच्या कुस्ती परंपरेची माहिती देऊन ती अधिक विकसित करण्यासाठी मदत देण्याची मागणी केली. पालकमंत्री विखेंनी बोलताना, वाडियापार्क मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असून, येथे सिंथेटीक ट्रॅक व व्यापक क्रीडा संकुल करण्याची मागणी केली.