नागपूर – छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर, महाविकास आघाडीची नागपुरातील सभेची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. नागपूर हे भाजप पक्षाचा गड मानला जातो. याच नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून या सभेला कोण कोण नेते उपस्थित राहतील याची चर्चा सध्या सुरु आहे. अशात विरोधी पक्षनेते अजित पवारांवरुन येणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता स्वःताच अजित पवार यांनी नागपुरातून पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले,’प्रत्येक जिल्ह्यात कुणाचं ना कुणाचं होम पीच असणारच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घ्यायला जातो आहे. जसं त्यांचं होम पीच आहे, तसं अनिल देशमुख, सुनील केदारांचं होम पीच आहे. नितीन राऊतांचं होम पीच आहे”, असं अजित पवार म्हणाले नागपूरात ते येणार कि नाही येणार ? या चर्चांवर म्हणाले,“मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती” असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, अजित पवार नागपुरात सभेला येणार की नाही? यावरुन नागपुरात चर्चा रंगलीय. याआधी संभाजीनगरच्या सभेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नव्हते. मात्र आता अजित पवारांच्या नागपुरातल्या हजेरीवरुन साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अजित पवार भाजपसोबत जाणार का? असं चर्चेचं वादळ सुरु असताना, नागपुरातल्या सभेवरुन अजित पवारांकडे नजरा लागल्यात.