लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला असून शिवसेनेचे उपशहर प्रमुख असलेले संजय भोईर आणि महिला सहसंघटिका असलेल्या मनीषा भांगरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशा नंतर लगेच संजय भोईर यांच्याकडे शिंदे गटाचे शहर प्रमुख पद तर मनीषा भांगरे यांच्याकडे महिला शहर संघटकपद देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले. लोणावळा शहरात शिवसेनेची चांगली ताकत असल्याने त्यावेळी शिंदे गटात येथील कोण जाते याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, त्यावेळी शिंदे गटात कोणीही न गेल्याने शिंदे गटाचा अस्तित्व शहरात कुठेही दिसत नव्हते.
मात्र, आता संजय भोईर आणि मनीषा भांगरे यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला आशा निर्माण झाली आहे. शिवसेना उबाठा गटाचे अनेक आजीमाजी पदाधिकारी आणि नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश शिंदे गटात होईल असा विश्वास संजय भोईर यांनी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख असलेले संजय भोईर आणि महिला सहसंघटिका असलेल्या मनीषा भांगरे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला.