तळेगाव ढमढेरे (पुणे)-वाढीव दराने विक्री का करता असा जाब विचारल्याने येथील एका स्टॅम्प व्हेंडरने एका व्यक्तीची कॉलर धरून शिवीगाळ व दमबाजी केली. या स्टॅम्प व्हेंडरचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे हक्कसोडपत्र करणेकामी गणेश लक्ष्मण पुंडे आले असता त्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प रजिस्टर ऑफिस कामी लागत होता. त्यामुळे व्हेंडरकडे 100 रुपयांचा स्टॅम्प घेणे करिता गणेश पुंडे गेले असता 100चा स्टॅम्प 120 रुपये कसा घेता असे विचारले. यावर व्हेंडरने पुंडे यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून दमबाजी केली आणि जाणीवपूर्वक स्टॅम्प शिल्लक नसल्याचे सांगून दिला नाही. या भागात अनेक दिवसांपासून काही स्टॅम्प व्हेंडरकडून 100 रुपयांचा स्टॅम्प 120 रुपये घेऊन चढ्या भावाने विक्री होत आहे. याबाबत आजपर्यंत दुय्यम निबंधक अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
स्टॅम्प व्हेंडर स्थानिक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. स्टॅम्प व्हेंडर अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होते. या भागात अधिकृत सात स्टॅम्प विक्रेते आहेत. सब रजिस्टरकडे असलेला स्टॉक रजिस्टर ऑफिसमध्ये दिसून येत नसल्यामुळे सर्व सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे.