संपत्ती निर्मिती ही दम बिर्याणीसारखी का आहे?

“संपत्ती निर्मिती ही एक मोठी राष्ट्रीय सेवा आहे. आपल्या देशातील श्रीमंत निर्मात्यांना ओळखणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं ही काळाची गरज आहे. त्यांना अधिक सन्मान मिळाला पाहिजे.” १५ ऑगस्टच्या आपल्या भाषणांत पंतप्रधानांनी अगदी सूचक विधानं केलेली दिसली. वेगवेगळे वित्तीय पर्याय हे गुंतवणूकीची विविध उद्दिष्टं पूर्ण करतात. त्यातील एक लोकप्रिय उद्दीष्ट म्हणजे नियमित उत्पन्न. हे, संपत्ती जमवण्यासाठी संरचित केलेल्या आर्थिक पर्यायांपेक्षा भिन्न आहे. त्यामुळं आपण पहात असलेला पर्याय नियमित उत्पन्न आहे किंवा संपत्ती निर्मिती आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.

संपत्ती म्हणजे तुमच्या सर्व साधनांची म्हणजे, रोख रक्कम, जमीन, मालमत्ता, सोनं, मौल्यवान रत्नं, पेंटिंग्स, पुरातन वस्तू, शेअर्स, रोखे इं.ची एकूण गोळाबेरीज. या साधनांच्या किंमती वाढतील या अपेक्षेने यांमध्ये खरेदी किंवा गुंतवणूक करुन संपत्ती तयार केली जाते. दीर्घ कालावधीत ह्यांचे वाढलेलं एकूण मूल्य म्हणजेच संपत्ती. याउलट, नियमित उत्पन्न मिळवणं ही अधिक प्रयोजित प्रक्रिया आहे. बँक किंवा कॉर्पोरेट मुदत ठेवी, डिबेंचर्स आणि बचत योजना इ. योजना ही नियमित उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीनं विकसित केलेली साधनं आहेत.ज्यांमध्ये गुंतवणुकीचं मूल्य वाढत नसून त्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज हे नियमित उत्पन्न म्हणून उपयोगात आणता येऊ शकतं.

सध्या सोन्याच्या भावानं चांगलीच झळाळी पकडलीय परंतु त्यातून आपणांस नियमित उत्पन्न मिळवता येत नाही आणि जे काय आपण पदरात पाडून घेऊ शकतो ते म्हणजे घेण्याच्या व विकण्याच्या भावातील फरक. वर उल्लेख केलेल्यांपैकी कांही साधनं अशी आहेत की ज्यांद्वारे नियमित उत्पन्न देखील मिळू शकतं आणि दीर्घावधीनंतर त्या मालमत्तेचं रूपांतर एक प्रकारच्या संपत्तीत झालेलं आपण पाहू शकतो. उदा. घर आणि शेअर्स. अतिरिक्त घर वाजवी दरात घेऊन त्यावरील भाडं हे नियमित उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतं तर लाभांश देणाऱ्या उत्तम कंपन्यांच्या खरेदीतून लाभांशाचा नियमित परतावा मिळून कालांतरानं शेअर्सचं मूल्य वाढून त्यांचं रूपांतर मालमत्तेत होऊ शकतं. आपल्या तब्येतीस काय सोसतंय हे ज्याचं त्यानं ठरवावं. संपत्ती ही दम-बिर्याणी सारखीच आहे ज्याचीचव आपण मधूनच नाही घेऊ शकत परंतु संयम बाळगल्यास एक अवर्णनीय अद्भुत चवीची अनुभूती मिळू शकते. Patience Pays!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×