बंगळूरू : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) हा अनैतिक आणि घटनेच्या आत्म्याविरोधात आहे. शहाणे सरकार तो तातडीने मागे घेईल, असे मत प्रख्यात इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) तातडीने थांबवणे हे विश्वास कमावण्याचे पहिले पाऊल ठरेल. त्यामुळे देशाला झालेल्या जखमा भरून येतील, असे त्यांनी सांगितले आहे.
दोन गोष्टी अगदी स्वच्छ आहेत. 1) एनआरसी तातडीने रद्द करून विश्वास निर्माण करण्याचे पहिले पाऊल टाकावे. त्यातून देशाच्या जखमा भरून यायला सुरवात होईल. 2) का हा अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. शहाणे सरकार तो लवकरच रद्द करेल, असे ट्विट गुहा यांनी केले आहे.
का आणि एनआरसीच्या विरोधात गुरूवारी केलेल्या आंदोलनात अन्य काही जणांसह गुहा यांना अटक केली होती. प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या कारवाई बाबत बोलतान गुहा म्हणाले, ही पुर्णत: लोकशाहीच्या विरोधातील कृती होती. पोलिसांनी शांततापूर्ण निदर्शने करू दिली नाहीत. हाच नागरिकांचा लोकशाहीत्मक हक्क आहे का?